सांगली/कडेगाव : डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने वृत्त येताच शुक्रवारी रात्रीपासून कडेगाव व पलूस तालुक्यात व परिसरात सन्नाटा पसरला होता. या नेत्याने ताकारी, टेंभू योजनांच्या माध्यमातून या दुष्काळी भागात हरितक्रांती केली. रोजगार निर्मितीमधून हजारो कुटुंबांचे संसार फुलविले. त्यामुळे इथल्या प्रत्येक घरात कर्ता पुरुष गमावल्याचे चित्र दिसत होते. शुक्रवारी रात्री कदम यांच्या निधनाचे वृत्त कडेगाव-पलूस तालुक्यात समजताच एकच शांतता परिसरात पसरली, तर अनेकांच्या घरातली चूलही पेटली नाही.
शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दोन्ही तालुक्यातील शाळा, महाविद्यालयात डॉ.पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व शाळांना सुट्टी देण्यात आली. कडेगाव, वांगी, सोनहिरा कारखाना, चिंचणी, सोनसळ, शिरसगाव, देवराष्ट्रे आदी गावांसह सर्व गावोगावी डॉ. पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. दरम्यान चाहत्यांच्या आक्रोशाने सोनहिरा हेलावला। कंठात दाटलेले हुंदके, डोळ्य़ांतून ओघळणारे अश्रू आणि भावनावेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सोनहिरा कारखाना व सोनसळ परिसरातील वातावरण शनिवारी कमालीचे भावूक झाले. कदम यांच्या जन्मगावी सोनसळ येथे तसेच कडेगाव-पलूस तालुक्यात प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. आमचा देव हरपला असा आवाज दाटून आलेल्या कंठातून निघत होता.
तशा पोस्ट सोशल मीडियात सर्वत्र फिरत होत्या. 'साहेब परत या’ अशी इच्छा व्यक्त केली जात होती. अनेक जण धाय मोकलून रडत होते. साहेब आपल्यात नाहीत हेच त्यांना सहन होत नव्हते. कडेगाव पलूस तालुक्यासह, जिल्ह्यातील आणि राज्यातील आजपर्यंतच्या अनेक सभा डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्या दिलखुलास गाजवल्या होत्या. मात्र, यापुढे त्यांचा आवाज येथे परत ऐकू येणार नसल्याची खंत प्रत्येकालाच जाणवत होती. चाहत्यांच्या आक्रोशाने सोनहिरा हेलावला. कंठात दाटलेले हुंदके, डोळय़ांतून ओघळणारे अश्रू आणि भावनावेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सोनहिरा कारखाना परिसरातील वातावरण शनिवारी कमालीचे भावूक झाले.
दरम्यान सोनहिरा कारखाना परिसरात दुपारी ४ वाजता डॉ.पतंगराव कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांचेसह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मोठी गर्दी होणार असल्यामुळे वाहनांच्या पार्किंगसह बैठक व्यवस्था याबाबत याबाबतची माहिती घेतली. तसेच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.