प्रताप महाडिक कडेगाव : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहरात प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील, सरला पाटील, रुक्मिणी पाटील, मधुरा पाटील, हर्षवर्धन पाटील (चिंचणी -तालुका कडेगाव) यांच्यासह ओमान स्थित वीरेंद्र जाधव (फलटण), दीपक कुंभार व करीम मुलाणी (निमसोड, तालुका कडेगाव ), अनिल जोशी, सोनाली जीशी, प्रीती जोशी (भिलवडी, तालुका पलूस ), डॉ. श्रीमंत अडसूळ (बार्शी जिल्हा सोलापूर ), प्रशांत सोनावणे (लातूर ), सदाशिव मांगले, समृद्धी मांगले (गडहिंग्लज), डॉ. संजय निकम (कऱ्हाड) आदी भारतीय नागरिकानी दिवंगत नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली.
यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल तिव्र दुःख व्यक्त केले व त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित भारतीय नागरिकांनी गरिबांचा कैवारी व लाखोंचा पोशिंदा हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त करताना डॉ. पांडुरंग पाटील म्हणाले, मी १२ वीला असताना माझ्या वडिलांचे निधन झाले.
अनंत अडचणींना सामोरे जात मी कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजला बीएस्सी झालो. पुढे शिकण्याची माझी परिस्थिती नव्हती. यावेळी डॉ. पतंगराव कदम साहेबानी मला पुण्याच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात एमएस्सीला प्रवेश दिला. पुढे मी पीएचडी केली. यानंतर मी लिबिया देशात प्रोफेसर म्हणून नोकरीसाठी गेलो. लिबियात अस्थिरतेमुळे फेब्रुवारी २०११ मध्ये माझ्यावर ओढवलेल्या संकटातूनसुद्धा मला साहेबांनीच बाहेर काढले व सुखरूप भारतात आणले होते.
आता मी ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कत शहरात तेथील मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या तांत्रिक महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. अशाप्रकारे संकटकाळी धावून येणारा आमचा आधारवड निखळला, असे प्रोफेसर डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अनेक भारतीय नागरिकांनी भारती विद्यापीठात शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी परदेशात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले व डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्धल दुःख व्यक्त केले.
साहेबांच्या फोनमुळे लिबियातून मायदेशात सुखरूप : डॉ. पांडुरंग पाटील सन २०११ मध्ये मी लिबिया देशातील अलमर्ग विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी त्या देशातील प्रजेने तेथील हुकूमशहा कर्नल गद्दाफी यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यावेळी तेथे अस्थिरता निर्माण झाली. अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयायांना मायदेशी आणण्याचे काम भारत सरकार करत होते, परंतु लिबियातील भारतीय दूतावासालाही माझ्याशी संपर्क साधणे कठीण झाले होते. या कठीण प्रसंगात मीही अडकलो होतो.
यावेळी चिंचणी येथील माझे मित्र डॉ. भरत महाडिक यांनी डॉ. पतंगराव कदम यांना सर्व हकिकत सांगितली. यावर डॉ. पतंगराव कदम यांनी भारताचे केंद्रीय मंत्री वायलर रवी यांना थेट फोन केला. साहेबांच्या या एका फोनची दखल घेऊन भारत सरकारने लिबियातील भारतीय दूतावासामार्फत मला २७ फेब्रुवारी २०११ रोजी सुरक्षीत मायदेशात आणले. परंतु या देवमाणसाने या ऋणातून मला उतराई होण्याची संधीही मला दिली नाही असे डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले.