सांगली : कृषी, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सांगलीची संपूर्ण देशभर ओळख होतीच; मात्र डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठामुळे जिल्ह्याची ओळख जगभर निर्माण झाली. त्यामुळे सांगलीचे खरेखुरे आयकॉन पतंगराव कदमच होते. पक्ष कोणताही असो, समोर येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान करण्याच्या त्यांच्या दातृत्वामुळे ते अव्दितीय असल्याची भावना मान्यवरांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी भावे नाट्यमंदिरात ‘आठवणीतील साहेब’ ही सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा झाली. यावेळी सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, नियती किती क्रूर होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे कदम साहेबांचे आपल्यातून जाणे आहे. नागपूर अधिवेशनात सक्रिय सहभागी असणारे आणि आम्ही केलेल्या आंदोलनाची भरभरून कौतुक करणारे डॉ. पतंगराव कदम आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ निर्माण करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यांना आयुष्यभर ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांना ते कधीही विसरले नाहीत.
राज्यातील नेत्यांमध्ये अव्वल स्थान त्यांचे होते. निर्णय घेताना त्यांच्यात असलेला धडाकेबाजपणा आजवर कोणत्याही नेत्यांत दिसत नाही. विश्वजित कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना ताकद देणे हीच कदम साहेबांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे.
खा. संजयकाका पाटील म्हणाले की, माणसांची गर्दी आणि गर्दीतला माणूस ओळखून त्याच्या कामास प्राधान्य देणारे कदम यांचे व्यक्तिमत्त्व होते. भान ठेवून योजना आखणारा व बेभान होऊन त्या अमलात आणणारा नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव विसरता येणार नाही.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले की, कोल्हापूरचे पालकमंत्री पद भूषविताना त्यांनी सांगलीइतकेच कोल्हापूरवरही प्रेम केले. इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग क्षेत्राला शासकीय मदत मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती.
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, साहेबांकडे घेऊन गेलेल्या प्रत्येक कामाला त्यांनी त्याक्षणी निधी दिला. पक्ष कोणताही असो, प्रत्येकाचे काम करून त्याला समाधान देताना त्यांना आनंद होत असे. मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्वाधिक कौतुक त्यांनी माझे केले होते.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील म्हणाले की, ज्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासमोर आदर्श ठरावे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. शैक्षणिक संस्थांच्या कारणाने त्यांच्याशी संबंध आला, परंतु त्यांचा सहभाग समृध्द करणारा ठरला. कार्यक्रम करताना सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, हा त्यांचा उद्देश असे. एकदा दुसºया मजल्यावर कार्यक्रम आयोजित केला होता. हे जाणून त्यांनी यापुढे कार्यक्रम वरच्या मजल्यावर घेत जाऊ नका, अशा सूचना केल्या होत्या. साहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळेच आज अनेकजण चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहेत.
यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम, विश्वजित कदम, डॉ. एच. एम. कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, माजी आ. उमाजी सनमडीकर, दिनकर पाटील, प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, नीता केळकर सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांसह संख्येने नागरिक उपस्थित होते....आणि पलूस तालुक्याची निर्मिती झाली!यावेळी जयंत पाटील यांनी एक आठवण सांगितली. पाटील अर्थमंत्री असताना पलूस तालुक्याचा प्रस्ताव घेऊन पतंगराव कदम त्यांच्याकडे आले. मात्र, अर्थ विभागाच्या सचिवांनी एक प्रस्ताव मंजूर केला, तर संपूर्ण राज्यातून असे प्रस्ताव येतील आणि आर्थिक नियोजन बिघडेल, असा शेरा मारला. तरीही पतंगराव फाईल घेऊन सकाळी अकरा वाजताच दाखल झाले आणि त्यांनी या प्रस्तावावर जोपर्यंत तू सही करत नाहीस तोवर इथून जाणार नाही, असे सांगितले. अखेर दुपारी तीन वाजता सही केली. यावर धन्यवाद देत ते म्हणाले, जयंत, पलूस तालुक्यासाठी मी इतका का आग्रही आहे हे तुला आता समजणार नाही. त्यानंतर सात वर्षांनी पलूस तालुका त्यांच्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी आठवण करून देत पलूससाठी मी का आग्रही होतो हे समजले का, असे विचारले. यावरून त्यांची दूरदृष्टी लक्षात येत असल्याचे सांगितले.माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी सांगलीतील भावे नाट्यमंदिरात ‘आठवणीतील साहेब’ ही सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा झाली. यावेळी सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी झाली होती. आ. जयंत पाटील यांनी कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.