सांगली : येथील डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल हाॅस्पिटल) अतिदक्षता विभागाच्या इमारतीवरून उडी घेतल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. पिटर दास फिलीप (वय ४०, रा. घोरपडी, पुणे) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. विश्रामबाग पोलिसात घटनेची नोंद आहे.
पुणे शहरातील घोरपडी परिसरात पिटर फिलीप राहण्यास होता. गुरुवार, दि. १७ रोजी अतिमद्यपानाचा त्रास होत असल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. या कालावधीत रुग्णालय प्रशासनाने माहिती घेत, पिटरच्या नातेवाईकांना याची माहिती दिली होती.
शनिवारी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर त्याने रुग्णालयातून पलायन केले. हा प्रकार लक्षात येताच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून त्याला पुन्हा रुग्णालयात आणत दाखल केले होते. त्यानंतर तो पुन्हा अतिदक्षता विभागातून इमारतीच्या छतावर आला. यावेळी तिथे असलेल्या रुग्णालय कर्मचारी व जवानांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही समजण्याच्या आतच त्याने इमारतीवरून उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व घटनेची नोंद केली. त्याने उडी का घेतली, यामागचे कारण समजू शकले नाही.
आणले कोठून? : नोंदच नाही!पुण्यातील रहिवासी असलेल्या पिटर फिलीप याला १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नेमके कोणत्या ठिकाणाहून त्याला येथे आणले, याची नोंद दप्तरात नव्हती. १०८ रुग्णवाहिकेला माहिती देणारी व्यक्तीही त्याला दाखल करून निघून गेल्याने नेमकी माहिती रुग्णालय प्रशासनाकडेही नव्हती.