इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. फुफ्फुसातील संसर्ग तपासण्यासाठी रुग्णांची एचआरसीटी तपासणी करून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्याचा फायदा उठवत शहरातील एचआरसीटी करणाऱ्या सेंटरमधून रुग्णांची लूट सुरू आहे. प्रशासनाने या गोरखधंद्याला वेळीच आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
कोरोना रुग्णांची एचआरसीटी तपासणी करण्यासाठी शासनाने यापूर्वीच २५०० रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र, शासनाच्या या आदेशाला येथील तपासणी केंद्रांनी केराची टोपली दाखविली आहे. २५०० रुपयांची पावती द्यायची आणि रुग्णांकडून मात्र किमान एक हजार रुपये जादा आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांची परिस्थिती बघून हा दर आकारला जात आहे.
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची एचआरसीटी तपासणी करण्यासाठी इस्लामपूूर हे मुख्य केंद्र आहे. चार ते पाच तपासणी केंद्रे आहेत. यातील काही केंद्रांवर जादा पैसे आकारण्याचा गोरखधंदा सुरू आहे. तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांची तारांबळ ओळखून त्याच असहाय्येचा फायदा घेतला जात आहे.
कोट
शहरातील एका केंद्रामध्ये एचआरसीटीसाठी जादा पैसे आकारले जात असल्याची तक्रार आली होती. तेथील यंत्रणेला शासन दराप्रमाणे आकारणी करण्याची सक्त ताकीद देऊन जादा पैसे घेतलेल्या पाच रुग्णांचे पैसे परत घेतले आहेत.
- ओंकार पाटील, सामाजिक कार्यकर्ते