सांगली : मिरजेतील शासकीय रुग्णालयात अश्विनी कांबळे या महिलेसाठी दिलेले रक्त गायब झाल्याचा व तिला रक्त न चढविताच रुग्णालयातून घरी पाठविल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी डेमोक्रॉटिक पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने १0 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे सतिश लोंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.लोंढे यांनी सांगितले की, आळते (ता. हातकणंगले) येथील अश्विनी शाहुजी कांबळे ही मिरजेच्या शासकीय रुग्णालयात २६ नोव्हेंबर २0१८ रोजी दाखल झाली. मिरजेत तिचे मामा संभाजी होळकर रहात असल्याने ती मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती.
तपासणीनंतर तिच्या शरीरात केवळ ६ टक्के रक्त असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला रक्त चढविण्याची मागणी केली. त्यासाठी पर्यायी रक्तपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे येथील रक्तपेढीमध्ये अल्लाबक्ष चौधरी, प्रदीप साळुंखे व योगेश कोळी या तिघांनी रक्तदान केले. रक्तदानाची पावती, त्यावर संबंधित रुग्णाच्या नावाचा उल्लेख व प्रमाणपत्रही रक्तदात्यांना देण्यात आले.रक्ताची व्यवस्था केल्यानंतर अश्विनी कांबळे यांना रक्त दिले जाईल म्हणून नातेवाईक निश्चिंत झाले, मात्र रुग्णाला रक्त चढविण्यात आलेच नाही. पर्यायी रक्त आम्हाला मिळालेच नसल्याचा कांगावा येथील प्रशासनाने केला. नातेवाईकांनी अधिष्ठाता पल्लवी सापळे यांना रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रेही दाखविली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
शेवटी रक्त न चढविताच रुग्ण असलेल्या अश्विनी कांबळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली आहे. हा प्रकार संतापजनक असून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. यासाठी येत्या १0 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कागदपत्रे सादरलोंढे व रुग्ण महिलेचे मामा संभाजी होळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सर्व कादगपत्रे सादर केली. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या रक्तदानाच्या पावत्या, प्रमाणपत्र आणि रुग्ण दाखलची कागदपत्रे यांचा यात समावेश आहे. संंबंधित रक्तदातेही यावेळी उपस्थित होते. त्यांनीही हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगितले.