लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या सभेसाठी आलेल्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना पोलीस अधिका-यांनी सभागृहात जाताना रोखल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर या प्रकारावर नाराजी व्यक्त करत खासदारांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी खा. माने आणि पोलीस अधिकाºयांत खडाखडी झाली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनावर खासदारांनी नाराजी व्यक्त करत ‘डीपीडीसी’सारख्या महत्त्वाच्या सभेवेळी असे प्रकार व्हायला नकोत, अशी भूमिका मांडली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीनला सभेचे आयोजन केले होते. अर्ध्या तासाच्या विलंबानंतर सभेस प्रारंभ झाला. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सभागृहाच्या बाहेरील दरवाजासमोर आठ ते दहा पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी लक्षात न आल्याने पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी खासदारांना सभागृहात जाता येणार नाही, म्हणून अडविले. त्यावर खासदार माने यांनी त्यांची ओळख करून दिली व ‘तुम्ही लोकप्रतिनिधींचा अपमान कसा काय करू शकता?’ असा सवाल केला. यावर आतमध्ये जाण्याची विनंती पोलीस अधिकाºयांनी केली.
लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडविणे चुकीचेरस्त्यात अशाप्रकारे लोकप्रतिनिधींना अडविणे चुकीचे आहे. मतदारसंघातील जनतेलाही काहीवेळासाठी भेटायचे असते, त्यामुळे ही अडवणूक चुकीची असल्याचे प्रतिपादन खासदारांनी केले. या प्रकारावर नाराजी व्यक्त करीत खासदारांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दरवाजासमोरील पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला.
नियोजन समितीच्या सभेसाठी जाताना शनिवारी खा. धैर्यशील मानेंना पोलीस अधिकाऱ्यांनी रोखले.