सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात कोठे बेड शिल्लक आहे, याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत कक्ष सुुरू केला आहे. तेथील कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.
ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध होण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे. यासाठी चोवीस तास सेवा देणारी दोन हेल्पलाईन सेंटर चालू केली आहेत. यावर दहा लँडलाईन क्रमांक कार्यरत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना तत्काळ बेडच्या उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. यासाठी ५० कर्मचारी कार्यरत असणार असून त्यांना जिल्हा परिषदेत प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना रुग्णांसाठी सांगली जिल्ह्यातील बेड उपलब्धतेबाबत आवश्यक ती माहिती घेण्यासाठी नागरिकांनी ०२३३२३७४९००, ०२३३२३७५९०० या दोन दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे.