दत्ता पाटील
तासगाव : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळीही पाटील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. कट्टर विरोधक असूनही खासदार आणि आमदारांच्या ‘अंडरस्टॅन्डिंग’ची चर्चा होत असल्याने तासगावचे पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे शहराचे लक्ष आहे. वेगवेगळ्या पक्षातील पाटील एकजुटीने स्वत:च नेतृत्व करणार की अंजनी, चिंचणीच्या पाटलांचा झेंडा घेऊन उतरणार, याची उत्सुकता आहे.
नगरपालिका निवडणुकीत तासगावच्या पाटलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. पहिले थेट नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी १९७४ ते १९८१ आणि १९९१ ते १९९५ या कालावधीत नगराध्यक्षपद भूषवले होते. या काळातच तासगावच्या पाटीलकीचे महत्त्व अधोरेखित झाले. तालुक्यातील अन्य नेत्यांना न जुमानता त्यांनी कर्तृृत्वाचा ठसा उमटवला. त्यानंतर गुलाबकाका पाटील यांनीही स्वत:चे नेतृत्व सिध्द केले.
तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत तासगावचा पाटील फॅक्टर निर्णायक ठरला आहे.
राष्ट्रवादीकडून अजय पाटील, भाजपकडून बाबासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पालिकेत सत्ता कोणत्याही गटाची असली आणि सत्तेत पाटील असले, तरी निर्णय प्रक्रिया मात्र अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या हातातच राहिली आहे. सत्तेत आल्यानंतर शहरातील पाटील कोणत्याच निर्णयात दिसून येत नाहीत. महादेव पाटील यांनी खासदार संजयकाकांशी फारकत घेत शहरातील काँग्रेसचे नेतृत्व केले. गतवेळच्या निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला. अजय पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली, तर बाबासाहेब पाटील आणि दिग्विजय पाटील यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. शहरातील पाटील वेगवेगळ्या गटातटांत विभागल्यामुळे अंजनी किंवा चिंचणीच्या पाटलांचे वर्चस्व कायम राहिले.
यावेळच्या निवडणुकीला अद्याप अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वपक्षीय पॅनेल चर्चेत आले आहे. शहरातील सर्व पाटील एकत्रित येऊन लढणार की अंजनी, चिंचणीच्या झेंडा घेऊन, स्वबळ आजमावून रिंगणात उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
प्रभाव नेत्यांचाच
शहराच्या राजकीय पटलावर अनेक पाटील सातत्याने सक्रिय आहेत. मात्र त्यांना अद्याप एकहाती नेतृत्व सिध्द करता आले नाही. अंजनी किंवा चिंचणीतील नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय शहरात प्रभाव पाडता आला नाही. एखादा पाटील वरचढ ठरू लागल्याचे दिसून येताच, नेत्यांकडूनच पंख छाटले गेल्याचा अनुभवही नवा नाही.