सांगली : कौटुंबिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना तब्बल दीड वर्षानंतर शुक्रवारी उघडकीस आली. राजू वाघमोडे (वय ४३, रा. हनुमाननगर, सांगली) असे मृताचे नाव असून, विच्छेदन तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. याप्रकरणी पत्नी छाया राजू वाघमोडे (२८) व बिराप्पा तुकाराम पांढरे (३०, दोघे रा. हनुमाननगर) यांना अटक केली आहे.
वाघमोडे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पाथरी गावचे आहे. उदरनिर्वाहासाठी ते सांगलीत हनुमाननगरमध्ये राहते. मृत राजू वाघमोडे यांनी पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर छायाशी विवाह केला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना अक्षय (२२) हा मुलगा होता. तो पाथरीत राहत होता. २०११ मध्ये वाघमोडेचा अपघात झाला होता. त्यावेळी रुग्णालयातील उपचाराचा खर्च संशयित मेहुणा बिराप्पा पांढरे याने केला होता. यासाठी सत्तर हजार रुपये खर्च आला होता. पण पांढरे हा दोन लाखाचा खर्च झाल्याचे सांगून पैशाची मागणी करीत होता. त्यानंतर वाघमोडेला दारूचे व्यसन लागले. तो दारूच्या प्रचंड आहारी गेला होता. कामधंदा काहीच करीत नव्हता. पत्नी छाया व मेहुणा पांढरेकडे पैशाची मागणी करीत असे. तसेच पहिल्या पत्नीचा मुलगा त्याची काहीच विचारपूस करीत नव्हता. खर्चासाठी पैसेही देत नव्हता. त्यामुळे छाया व पांढरे हे दोघे वाघमोडेवर चिडून होते.
वाघमोडे याचा पैशाबाबतीत खूप त्रास वाढला होता. त्याला फुकट पोसणे या दोघांना असह्य बनले होते. त्यामुळे या दोघांनी त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार ६ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी एक वाजता वाघमोडेचा घरीच गळा आवळून खून केला. हा खून पचविण्यासाठी त्यांनी मृतावस्थेत वाघमोडेला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी, ‘काय झाले आहे’, अशी विचारणा केली. यावर त्यांनी घरी अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वाघमोडे मृत झाल्याचे लक्षात आले. मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली होती. पण डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी विच्छेदन तपासणीचा व्हिसेरा राखून ठेवला होता. तो पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला होता. याचा अंतिम अहवाल गेल्या आठवड्यात प्राप्त झाला. यामध्ये वाघमोडे यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.सात दिवसांची पोलीस कोठडीवाघमोडे यांच्यावर त्यांच्या पाथरी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा अक्षय पुन्हा सांगलीत आलाच नाही. तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत त्याने पोलिसांकडे काहीच चौकशी केली नाही. वाघमोडेंचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम अक्षयला बोलावून घेतले. त्याच्या वडिलांचा खून झाल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर त्याने सावत्र आई छाया व तिचा भाऊ पांढरे यांच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी, आम्ही काही केलेच नाही, अशी भूमिका घेतली. पण कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वाघमोडेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तपास फाईलबंदवाघमोडे यांच्या मृत्यूचे निदान सर्वप्रथम लागले नव्हते. आकस्मिक मृत्यू, अशी नोंद करून पोलिसांनी काही दिवस तपास केला. तसेच वाघमोडे यांचा मुलगा अक्षय यानेही काहीच तक्रार केली नाही. त्यामुळे तपास फाईलबंद केला होता. मृतदेह विच्छेदन तपासणीमुळे ही फाईल पुन्हा उघडली गेली.