फोटो : ०७०६२०२१ वसंत गावडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जमिनीच्या सातबारा नोंदीबाबत आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्याच्या मोबदल्यात आठ हजारांची लाच मागणाऱ्या पलूसच्या मंडल अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. किरण नामदेव भिंगारदेवे (वय ५७, रा. नेहरुनगर, विटा) असे त्याचे नाव असून, लाच स्वीकारणाऱ्या वसंत रामचंद्र गावडे उर्फ बापू (७१, रा. पलूस) या मध्यस्थाला रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदाराने त्याच्या पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या नोंदीसाठी तक्रार करण्यात आली असून, त्याची चौकशी मंडल अधिकारी भिंगारदेवे याच्याकडे सुरू होती. हा तक्रार अर्ज निकाली काढून जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी भिंगारदेवे याच्या हाताखाली काम करणाऱ्या वसंत गावडे याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने मार्च महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून अर्ज दिला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, दहा हजार लाचेची मागणी करून चर्चेअंती आठ हजारांवर तडजोड केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर सोमवारी दत्तनगर येथे पथकाने सापळा लावला. यावेळी मध्यस्थ गावडे याने तकारदाराकडे लाचेची मागणी केली व आठ हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. मंडल अधिकारी भिंगारदेवे याच्यासाठी लाच घेतल्याची खात्री झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरूदत्त मोरे, बाळासाहेब पवार, सीमा माने, संजय संकपाळ, अविनाश सागर, रवींद्र धुमाळ, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.