सांगली : भाजीविक्रेत्यास तलवार आणि चाकूचा धाक दाखवून पन्नास हजार रूपये खंडणी दे नाहीतर तुला संपवून टाकू अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी भाजीविक्रेता रवी कल्लाप्पा कुडचे (वय ३०, रा. दत्तनगर, कर्नाळ रस्ता, सांगली) याने संशयित रवि चंडाळे (रा. शिवाजी मंडईसमोर राम टेकडी, सांगली) आणि त्याचा मित्र छोटू (नाव माहित नाही) यांच्यावर शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, फिर्यादी रवी कुडचे याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवार दि. १ रोजी सकाळी ९ वाजता ते शिवाजी मंडईतील दुकान गाळ्यात भाजी विक्रीस बसला होता. त्यावेळी संशयित रवी आणि छोटू त्याच्याकडे आले. दोघांनी धमकावून २ हजार रुपयाची खंडणीची मागणी केली. भितीमुळे फिर्यादी रवि कुडचे यांनी त्यांना २ हजार रुपये दिले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २ रोजी दुपारी १२ वाजता संशयित दोघे पुन्हा तलवार आणि चाकू घेवून रवी याच्याकडे आले. दोघांनी पुन्हा ५० हजार रुपयाच्या खंडणीची मागणी केली. रवी याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून खंडणी न दिल्यास संपवून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रवी याने सांगली शहर पोलिस ठाणे गाठून दोघांविरूद्ध फिर्याद दिली.
Sangli: पन्नास हजाराची खंडणी दे नाहीतर संपवतोच, भाजी विक्रेत्यास धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा
By घनशाम नवाथे | Published: July 03, 2024 6:40 PM