कडेगाव : चिंचणी तलाव तुडुंब भरला आहे. दोन आपत्कालीन दरवाजांपैकी एक दरवाजा नादुरुस्त आहे. तो दरवाजा दुरुस्त करता येत असेल तर तात्काळ दुरुस्त करा. एका दरवाजातून पाणी सोडले आहे. मात्र स्वयंचलित दरवाजांवर पाण्याचा प्रचंड दाब आहे. यातील काही दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडण्याची शक्यता आहे. यामुळे सतर्क राहून काम करावे, अशा सूचना कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी दिल्या आहेत.
डॉ. शैलजा पाटील यांनी शुक्रवारी दुपारी चिंचणी तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाटील म्हणाल्या, चिंचणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे व चिंचणीच्या पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तलावात अजूनही पाणी वाढणार आहे. त्या प्रमाणात सांडव्यातून विसर्ग होत नाही त्यामुळे स्वयंचलित दरवाजे आपाेआप उघडणार आहेत. हे दरवाजे उघडल्यानंतर सोनहिरा खोऱ्यातील आसद, मोहित्यांचे वडगाव, अंबक, देवराष्ट्रे या रस्त्यांवरील पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनहिरा काठच्या नागरिकांनी व पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी.
चौकट :
दक्षतेसाठी पुलांवर फलक लावा
सोनहिरा खोऱ्यातील पुलांवर सध्या पाणी नसल्यामुळे वाहतूक सुरू आहे. मात्र रात्री-अपरात्री केव्हाही दरवाजे उघडले तर पुलांवर पाणी येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनधारकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावावेत. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी दिल्या.
फोटो : १८ कडेगाव १
ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथे शुक्रवारी तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी तलावाची पाहणी केली.