सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी सेवासमाप्ती लाभासह मानधनाच्या अर्धी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींनी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना तसे मुंबईत निवेदन दिले.
कृती समितीच्यावतीने एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, नितीन पवार व सुवर्णा तळेकर यांनी ठाकूर यांच्याशी चर्चा केली. महिला व बालविकास विभागाचे सहसचिव जरांडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या उपायुक्त श्रीमती नगरकर, विशेष अधिकारी योगिनी सुर्वे हे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
ठाकूर म्हणाल्या, शासकीय व प्रशासकीय प्रक्रियेला काही वेळ लागेल, परंतु अंगणवाडी सेविकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती पावले नक्की उचलली जातील. थकीत सेवासमाप्ती लाभ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. इतर सर्व थकीत देयकांबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चेसाठी लवकरच बैठक घेऊ. मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती, मोबाईल व ऑनलाईन कामे आदी प्रश्नांवर विभाग पातळीवर सविस्तर बैठकीत चर्चा करू.
-------------------------