सांगली : लॉकडाऊन सुरू केल्यास बांधकाम कामगारांना दरमहा दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी बांधकाम कामगार संघटना कृती समितीचेे निमंत्रक शंकर पुजारी यांनी केली आहे. कामगार कल्याणकारी मंडळामार्फत निर्णय झाला नाही, तर लॉकडाऊनमध्येसुद्धा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित व स्थानिक बांधकाम कामगार होरपळून निघाले आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने पाच हजार रुपयांची मदत दिली. मंडळाकडे कामगारांच्या कल्याणासाठी दहा हजार कोटी रुपये रक्कम शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या लॉकडाऊनमध्ये दरमहा दहा हजार रुपये द्यावेत.
कामगारांना अत्यावश्यक अवजारे व साहित्यासाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळायचे, परंतु ही योजना फेब्रुवारी २०२० मध्ये बंद करण्यात आली. ती पूर्ववत सुरू करावी. योजना बंद होण्यापूर्वी मदतीची मागणी केलेल्या साडेचार लाख कामगारांना ती मिळावी.
पुजारी यांनी सांगितले की, राज्यात कामगार कल्याणचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ऑनलाईनद्वारे चार लाख २५ हजार १८ अर्ज नव्या नोंदणीसाठी, २ लाख ४० हजार ६९ अर्ज लाभासाठी आणि ओळखपत्र नूतनीकरणासाठी २ लाख ८० हजार २९१ असे एकूण ९ लाख ४५ हजार अर्ज मंडळाकडे दाखल आहेत, परंतु त्यातील फक्त ४० हजार कामगारांनाच स्मार्ट कार्ड मिळाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया बंद करून पूर्वीप्रमाणेच प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याची सोय करावी. अशिक्षित कामगारांना ऑनलाईन प्रक्रिया शक्य नाही. मागील वर्षामध्ये ओळखपत्र नूतनीकरणाची मुदत संपलेल्यांनाही नूतनीकरण सलग धरून लाभ द्यावेत.