सांगली : साखर आणि साखर कारखान्यातील उपपदार्थांचे दर सध्या तेजीत आहेत. म्हणून ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा खर्च वजा करून प्रतिटन किमान तीन हजार ५०० रुपये दर दिला पाहिजे. त्यानुसार कारखान्यांनी गेलेल्या उसाची अंतिम बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी एसएमएसद्वारे साखर कारखानदारांकडे करत आहेत.ऊस दराच्या प्रश्नांवर माजी खा. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दरासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा एसएमएसद्वारे साखर कारखान्याच्या अध्यक्षांकडे तीन हजार ५०० रुपये दर द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. त्यानंतर ऑगस्टमध्ये कारखान्यांवर मोर्चाने जाऊन वाढीव ऊस दराची मागणी करणार आहे, अशी माहिती संजय कोले यांनी दिली.कोले म्हणाले, गेले दोन वर्षे बाजारातील तीन हजार १०० रुपये क्विंटलपेक्षा चढे राहिल्याने आता साखरेच्या एमएसपीला अर्थ राहिलेला नाही. तरीही साखरेची एसएमपी तीन हजार ७५० रुपये करा नाहीतर उसाची एफआरपी पूर्णपणे देता येणार नाही, अशी शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्र को -ऑप शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष पी. आर. पाटील व खासगी कारखानदारांच्या ' विस्मा ' चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे हे करत आहेत. साखरेची एसएमपी वाढवून द्या, अन्यथा एफआरपी देणार नाही, अशी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे.शासनाकडे कारखानदार चुकीची मागणी करत आहेत. यात काही अर्थ नाही. गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर तोडणी व वाहतुकीचे ७०० रुपये वगळून देत आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा कमी साखर उतारा असताना गणदेवी कारखाना प्रशासनाला जमत असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना का जमत नाही, असा सवालही कोले यांनी केला.
कारखाने पुढाऱ्यांची जहागिरी : संजय कोलेमहाराष्ट्रात सहकारी कारखाने सभासदांचे नव्हे तर, पुढाऱ्यांच्या खासगी जहागिऱ्या झाल्या आहेत. नुकतीच काही मंडळी सहकारी कारखाना खरेदीच्या व्यवहारातून कारवाया होऊ नयेत म्हणून पक्ष फोडून सत्तेत गेले आहेत. सभासद निष्क्रिय असल्याने कारखानदार आपलीच मुले अध्यक्षपदी बसवत आहेत, असा आरोपही संजय कोले यांनी केला.