इस्लामपूर : साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात चांगला पैसा मिळवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन घेण्यासाठीचा भांडवली खर्च वाढल्याने शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. त्यामुळे कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दराच्या आंदोलनाचा भाग म्हणून शेट्टी यांनी १७ ऑक्टोबरपासून आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली होती. १३ दिवसांत ३०० कि. मी. अंतराचा टप्पा पायी चालत गाठला होता. मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सगळीकडे अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे शेट्टी यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आपली पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी स्थगित केली होती.मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण गुरुवारी स्थगित केल्यानंतर माजी खा. शेट्टी यांनी तातडीने निर्णय घेत साखराळे येथील राजारामबापू कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली.यावेळी शेट्टी यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना निवेदन देऊन ४०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका, अशी विनंती केली. यावेळी त्यांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शेट्टी म्हणाले, साखर कारखानदारांनी गाळप क्षमता वाढवताना या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून प्रकल्प उभे केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कर्जाचा बोजा कारखान्यांनी शेतकऱ्यांना ज्यादा आलेल्या उत्पन्नातील हिश्श्यावर टाकला आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता कारखान्यांनी ४०० चा दुसरा हप्ता मिळावा.शेतकऱ्यांना मातीत गाडण्यासाठी कारखानदार, केंद्र सरकार आणि विरोधीपक्ष हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. आर. डी. माहुली यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखानदारांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला.यावेळी संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, हणमंत माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, स्वाभिमानीचे आप्पासाहेब पाटील, अॅड. एस. व्ही. संदे, भागवत जाधव उपस्थित होते.
४०० चा दुसरा हप्ता द्या, मगच कारखाने सुरू करा; राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 12:55 PM