शिराळा : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील पर्वतवाडी परिसरात चिराच्या बेटात मोराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) अडकलेल्या जुन्या मासे पकडण्याच्या गळामध्ये अडकून एका मोराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) दुपारी तीन वाजता घडली. मोराच्या मृतदेहाचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.वन विभागाच्या रेड (ता. शिराळा) बिटमधील पर्वतवाडी येथे मोराचा मृतदेह आढळला. मासे पकडण्याच्या गळामध्ये तो अडकला होता. चावरे पाणंदमधील वारणा नदीकाठी चिराच्या बेटावर हा गळ लावला होता. तो बरेच दिवस तेथेच अडकला असावा. या ठिकाणी मोर उडताना त्याचा पंख गळात अडकला. त्यात तो जखमी झाला. त्यातच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच वन विभागाचे विशाल डुबल, एस. डी. पाटील, प्राणीमित्र युनुस मणेर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
उपचार केंद्र, रेस्क्यू पथकाची आवश्यकताशिराळा येथे वन्य प्राणी उपचार केंद्र नसल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात एका मोराचा उपचारांअभावी मृत्यू झाला होता. जखमी मोराला घेऊन जाण्यासाठी वाहन नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी चक्क दुचाकीवरून नेले होते. त्याची चित्रफीतही प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर सोमवारी आणखी एका मोराचा मृत्यू झाला. त्यामुळे शिराळा येथे उपचार केंद्र व रेस्क्यू पथकाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.