शरद जाधव
सांगली : शहरातील जुना बुधगाव रोडवरील संभाजी कॉलनी येथे दोन मोरांची शिकार करण्यात आली. शिकार करून ती पोत्यात घालून ते घेऊन जात असताना नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. यानंतर पाठलाग करून संशयितांना पकडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून साहित्य जप्त केले.
जुन्या बुधगाव रोडवरील वाल्मिका आवास योजना परिसरापासून जवळच संभाजी कॉलनी आहे. याठिकाणी शेती असल्याने या भागात मोरांची संख्या मोठी आहे. शनिवारी सकाळी काहीजण या भागात आले व त्यांनी जाळ्या लावून ते थांबले होते. या जाळ्यात त्यांना एक मोर आणि एक लांडोर मिळाली. यानंतर त्यांना पोत्यात घालून ते जात होते. याचवेळी परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच मुलांनी तिथेच पोते टाकून धूम ठोकली. यातील एका अल्पवयीन मुलाला पाठलाग करून पकडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी झाकीरहुसेन काझी, डॉनियल घाटगे, संतोष गळवे, प्राणिमित्र मुस्तफा मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेत साहित्य जप्त केले. शहर पोलिसांनी वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही घटनास्थळी आले नाही.