मिरज : मिरजेत अर्ष झाकीर मुतवल्ली या बालकाचा डेंग्यू तापामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या बालरोगतज्ज्ञास नोटीस बजावली आहे. मिरजेतील विविध भागात सुमारे ३५ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असून डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.कृष्णाघाट रस्त्यावरील अर्ष मुतवल्ली यास वारंवार ताप येत असल्याने मिरजेतील आयुष रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर भारती रूग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. संबंधित बालकास डेंग्यूची लागण झाल्याचे महापालिका आरोग्य विभागाला कळविण्यात आले नव्हते.
याप्रकरणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी डॉ. संदीप पाटील यांना अर्ष मुतवल्ली याचे केलेले निदान व उपचाराची माहिती तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांना न दिल्यास रूग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.
मिरजेत शहर व परिसरात डेंग्यू तापामुळे नागरिक हैराण आहेत. दहा दिवसांपूर्वी डेंग्यूसदृश तापामुळे अस्वले कॉलनी व कोकणे गल्लीतील महिला व युवतीचा मृत्यू झाला होता. मात्र शहरात ब्राम्हणपुरी, गुरूवार पेठ, खॉजा वसाहत, मुजावर गल्ली, अस्वले कॉलनी, इस्त्राईलनगर परिसरात डेंग्यूसदृश तापाचे ३५ रूग्ण असून त्यांच्यावर खासगी व शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्राम्हणपुरीत मोहित विनय कुलकर्णी या दहा वर्षाच्या मुलास डेंग्यू तापाची लागण झाली आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून डासांच्या प्रतिबंधासाठी स्वच्छता व धूरफवारणीसह उपाययोजना करण्यात येत आहेत. उपायुक्त स्मृती पाटील यांनी डेंग्यू तापाच्या रूग्णांबाबत महापालिका आरोग्य विभागास माहिती देण्याची सूचना केली.