मिरज : मिरजेतील रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत अडीच कोटी रुपये खर्चाच्या ट्रिमिक्स काँक्रिट व हॉटमिक्स रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांवर दंडाच्या कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशामुळे पत्रे मारून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
मिरजेत दोन महिन्यांपूर्वी मिरजेतील हॉटेल सुखनिवास ते रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स पद्धतीने काँक्रिट व हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर दि. २३ नोव्हेंबर रोजी ठेकेदारास देण्यात आली आहे. मात्र, ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी सोमवारपासून या रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास महापालिका अधिकारी व ठेकेदारास दररोज १० हजार रुपये दंड आकारणीचे आदेश दिले आहेत. काम रखडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंस बांधलेल्या गटारीत पाणी साचले आहे. अतिक्रमणे हटविण्याचे व वृक्षतोडीचे काम थांबले आहे. या रखडलेल्या कामाबाबत नागरिक वारंवार तक्रारी करीत आहेत. यामुळे आयुक्तांनी याबाबत दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतल्याने महापालिका प्रशासनाने हा रस्ता पत्रे मारून बंद केला आहे. मात्र, या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.