सांगली : आरक्षणाच्या प्रश्नावरून जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही असामाजिक संघटना व व्यक्तिंकडून सुरू आहे. अशा परिस्थितीत आरक्षणावरून भांडण होणार नाही, याची दक्षता सर्व जाती-धर्मातील लोकांनी घ्यावी, असे आवाहन सांगलीत मंगळवारी विविध मान्यवरांनी संवाद मेळाव्यात केली.
येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवक समितीच्यावतीने मराठा, ओबीसी आरक्षण जागृती संवाद मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर अॅड. के. डी. शिंदे, नामदेव करगणे, अमृतराव सूर्यवंशी, शशिकांत पाटील, प्रा. सुभाष दडगे, उत्तम साखळकर, ओबीसी संघटनेचे सुनील गुरव, दत्तात्रय खंडागळे, नगरसेवक मंगेश चव्हाण, अय्याज नायकवडी, अमर पडळकर, अमर निंबाळकर, अॅड. अमित शिंदे, जयंत जाधव उपस्थित होते.
यावेळी के. डी. शिंदे म्हणाले की, एकीकडे असामाजिक संघटनांनी जाती-धर्मात भांडणे लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही भुरट्या विचारवंतांनी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशातील पहिले आरक्षण १९0२ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी दिले होते. पुढे अनेक अभ्यास समित्या स्थापन झाल्या त्यावेळी बहुतांश समितींनी काढलेला मागास समाजाचा निष्कर्ष हा शाहू महाराजांच्या निष्कर्षाशी जुळणारा होता. त्यामुळे शाहू महाराज किती दूरदृष्टीचे नेते होते, हे समजून घेतले पाहिजे. देशात राम, नथुराम आणि परशुराम यांना मानणाºयांपासून धोका आहे. त्यामुळे या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. राजेशाही गेल्यानंतर आपल्याकडे राजकीय घराणेशाही आली. यातील अनेक मराठा राजकीय घराण्यांनी मराठ्यांवरच अन्याय केले. त्यामुळे अशा अंतर्गत हानीकारक लोकांचाही बंदोबस्त यापुढील काळात केला पाहिजे.
यावेळी नामदेव करगणे म्हणाले की, काही शक्ती जाणीवपूर्वक आरक्षणाच्या मुद्यावरून ठिणगी टाकत आहेत. त्यांच्या या गोष्टींना बळी पडता कामा नये. ओबीसी समाजानेही आता मनुवाद्यांचे वाहक होणे बंद करावे. या गोष्टी टाळल्या तर आपला समाज प्रगती करू शकतो. मराठा समाजातील लोक हे आमचे बांधव आहेत. ही बंधुता शेकडो वर्षांची आहे. त्यामुळे ती यापुढेही अबाधित राहिल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघासारख्या संघटनांनी त्यांच ेकार्य पुढे नेताना महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे विचार बरोबर घेतले आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते.
अमृतराव सूर्यवंशी म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चावेळीसुद्धा जाणीवपूर्वक जातीय दंगली घडविण्याचा डाव काही असामाजिक तत्वांनी आखला होता. तो आम्ही यशस्वी होऊ दिला नाही. महाराष्टतील महामानवांच्या विचारांचा पगडा घट्ट असल्यामुळे ते लोक कधीही यशस्वी होणार नाहीत. आरक्षणापुरती ही लढाई मर्यादीत न ठेवता भविष्यात चांगल्या विचाराचे लोक निवडून देण्याचा प्रयत्न सर्व संघटनांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी युवक कॉंग्रेसचे संदीप जाधव, असिफ बावा, शाहीन शेख, सुरेश दुधगावकर, प्रशांत शेजाळ, अमर पडळकर, अय्याज नायकवडी, राजेंद्र माळी यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अॅड. अमित शिंदे यांनी, तर आभार सतिश साखळकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन मराठा आरक्षणाला पाठींंबा मेळाव्यात मुस्लिम समाजाच्यावतीने लालू मेस्त्री व अन्य लोकांनी मराठा आरक्षणास पाठींबा दर्शविला. त्याचबरोबर धनगर, वडार, माळी, लिंगायत आदी समाजातर्फे पाठींबा देण्यात आला. युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाºयांनी उपस्थिती लावत मराठा आरक्षण व संवाद मेळाव्याच्या उपक्रमास पाठींबा जाहीर केला.
आमदारांना निवेदन देऊ!अमृतराव सूर्यवंशी म्हणाले की, सर्व समाजघटकांच्यावतीने जिल्ह्यातील दहा आमदारांना व खासदारांना निवेदन देऊन आपल्या भूमिका स्पष्ट करू. आमच्या विचाराबरोबर जाणाºया लोकप्रतिनिधींनाच यापुढे निवडून देण्याचा निर्धारही सर्वांनी करायला हवा. चांगले लोक कारभारी म्हणून गेले तरच प्रत्येक समाजघटकाची प्रगती होईल.