विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात सध्या स्थानिक नागरिक आणि वन्यप्राणी यांच्यात सहजीवन बघावयास मिळत आहे. परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राणी यांच्यावर शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे.
जंगलात नैसर्गिक गवत खाद्याची कमतरता भासते. या दिवसात मार्च ते जूनपर्यंत जंगलातील गवे आणि इतर शाकाहारी प्राणी पोट भरण्यासाठी गावाच्या हद्दीत येत आहेत. चांदोली अभयारण्य परिसरात असणाऱ्या विविध गावांच्या आसपास मका, ऊस शेती, इतर भाज्या यांचे प्रमाण जास्त आहे. या हिरव्यागार चाऱ्याला आकर्षित होऊन रानगव्यासारखे प्राणी जनगलातून बाहेर येतात. येथील लोकांचे नुकसान होण, ही नित्याचीच बाब आहे.
परंतु गवे येत असल्यामुळे शेतकरी त्याचा राग न करता शिस्तबद्ध रीतीने आपल्या पिकांची राखण करत आहे. अभयारण्य परिसरातील शित्तूर, मनदूर, ऊखळ, काळोखेवाडी, सोनवडे, चरण, आरळा या भागातील सर्व शेतकरी आपल्या पिकांची रात्रीच्या वेळी आळीपाळीने राखण करत आहे. या परिसरात निरीक्षण केले असता, बऱ्याच शेतांमध्ये लोकांनी मचान उभारलेले दिसून येते.
लोक या मचाणावर रात्री बसून सकाळपर्यंत आपल्या पिकाची राखण करतात. या परिसरात प्रामुख्याने आढळणाऱ्या गवे, बिबटे, रानडुक्कर यांना समजून घेऊन त्यांच्या सोबत जगण्याचे कसब इथल्या लोकांनी आत्मसात केले आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्या, रानडुकरांचा त्रास कमी झाला आहे, असेही येथील स्थानिक सांगतात. परंतु त्या तुलनेत गवे आणि वानर यांचा पिकांना त्रास जास्त आहे.
बिबट्यामुळे गावांमध्ये कुत्री कमी झाली आहेत. शेळ्या मेंढ्या यांच्यावर सुद्धा हल्ले झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे.
लोकांनी रात्री सर्पदंश होऊ नये म्हणून पायात बूट घालावे, सोबत बॅटरी ठेवणे आणि एका वेळी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून गस्त करावी. लोकांनी वन्य प्राण्यांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करू नये. गैरवर्तन अथवा गैरकृत्य केल्यामुळे गव्यांचा हल्ला होऊ शकतो. वन्यप्राणी त्रास दिल्यामुळे अधिक आक्रमक होतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखादी जखमी जनावर दिसून आल्यास वनविभागाला १९२६ या क्रमांकावर कळवून सहकार्य करावे.