इस्लामपूर/शिराळा : ‘देशात धर्माच्या नावावर माणसा-माणसामध्ये अंतर वाढविण्यात काही लोक धन्यता मानत आहेत,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन करतानाच पवार यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या अनुभवाचा वापर राज्यपातळीवर करून घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.शिराळा येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या शेतकरी मेळावा आणि शिवाजीराव नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश कार्यक्रमात पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, अरुण लाड, अविनाश पाटील, सुस्मिता जाधव, छाया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, ‘शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची यशाची गुढी राज्यात भक्कम होईल. ते यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. सहकार, पंचायत राज, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील कामाचा त्यांचा अनुभव मोठा आहे. ते पुन्हा आपल्या घरी आले आहेत. सर्वांना सोबत घेत मतदारसंघातील जनतेचे हित जपण्याचे काम ते करतील.ते म्हणाले, ‘वाकुर्डे योजना पूर्णत्वाकडे जात असल्याने शिराळा भागातील पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. उसाची वाढती शेती ही न परवडणारी आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदलली पाहिजे. मर्यादित साखर निर्मिती करून इथेनॉल आणि इतर उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष द्यावे लागेल.जयंत पाटील म्हणाले, ‘शिवाजीराव नाईक यांनी जनतेच्या प्रश्नांवर कायम संघर्षाची भूमिका घेतली. ते कोठेही गेले तरी त्यांना माझ्या घरात यावे लागणार, ही मला खात्री होती. भाजप सोडून ते राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला अनुभवी नेत्याचे मार्गदर्शन लाभेल. भाजपवाल्या सारखे आम्ही बोलत नाही तर थेट करून दाखवतो.
धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाईसाठी जनतेने सज्ज व्हावे - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 4:29 PM