शिंदे म्हणाल्या की, महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ७ नगरसेवकांनी विरोधकांना मतदान केल्याने भाजपची महापालिकेतील सत्ता गेली. २०१८ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणी राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होती. बकाल खेड्याचे स्वरूप आलेल्या शहराचे रूप बदलण्याचे काम भाजपने केले. अडीच वर्षांत महासभेत एकही ऐनवेळचा विषय आणला नाही. एकाही जागेवरचे आरक्षण उठवले नाही. महापूर आणि कोरोनासारख्या संकटांत उत्तम नियोजन केले.
महापालिकेत भाजपचे नगरसेवक पैशाचे आमिष दाखवून फोडले आणि सत्ता मिळवली. घोडेबाजार करून सत्ता मिळवली असली तरी कारभारात कोणालाही घोडेबाजार अजिबात करू देणार नाही. चांगल्या कामासाठी जरूर साथ देऊ; पण बेकायदेशीर कामे होऊ देणार नाही. राष्ट्रवादी ज्याला करेक्ट कार्यक्रम म्हणते तो घोडेबाजार जनतेलाच मान्य नसून आगामी काळात जनताच उत्तर देईल, असा विश्वास ॲड. शिंदे यांनी व्यक्त केला.