सांगली : खानापूर, आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रचंड फैलाव झाला आहे. रुग्ण आणि नातेवाईक प्रचंड तणावाखाली असतानाच, यांना आजी-माजी आमदारांकडूनही मदतीचा हात दिला जात आहे. आमदार अनिल बाबर, आ.गोपिचंद पडळकर आणि माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी कोविड सेंटर उभा करण्यासाठी मदत करून जनतेला धीर देण्याचे काम केले आहे.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी खानापूर तालुक्यातील ५७ गावांना आतापर्यंत भेटी देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. विटा प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आ.बाबर यांनी एक कोटीचा आमदार फंड आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांसाठी खर्च केला आहे. अत्याधुनिक सुविधासह एक रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनी विट्यात ३८ बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे ॲड.बाबासाहेब मुळीक यांनी कोरोना योद्ध्यांना एक हजार किटची मदत केली असून, दोन ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली आहेत.
आटपाडी येथील बाल भवनमध्ये श्री सेवा कोविड सेंटर सुरु करण्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आ.राजेंद्रअण्णा देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे. आटपाडीचे शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी श्री श्री रविशंकर यांच्या सहकार्याने सुविधा कोविड सेंटर उभा केले आहे. नेत्यांच्या या छोट्या-मोठ्या कोविड सेंटरचा कोरोना रुग्णांसाठी मोठा आधार मिळत आहे. ऑक्सिजन नसेल, त्या रुग्णालयास तो उपलब्ध करून देण्यातही लोकप्रतिनिधीची मोठी मदत होत आहे.
चौकट
लोकप्रतिनिधींचा पुढाकार हावाच
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण व मृतांची संख्या, यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांच्या मनातील भीती नाहीशी करून त्यांना लक्षण दिसत असतील, तर चाचणी करून घेण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. यासाठी तालुका ते गावपातळीवरच्या राजकर्त्यांनी झोकून देऊन मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून मतदार जगविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेता, सर्वत्र शासकीय यंत्रणा पोहोचणे शक्य नाही. आपण त्यांना मदत केली, तरच कोरोना हद्दपार होईल.