लाेकमत न्यूज नेटवर्क
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील पाण्याची समस्या कायमची सोडवली आहे. शाळेचे माजी विद्यार्थी विकास राजाराम गंगधर यांनी स्वखर्चाने बोअरवेल करून दिले तर येथील त्रिमूर्ती इलेक्ट्रिकलच्या माध्यमातून संभाजी मारुती निंबाळकर यांनी स्वखर्चाने विद्युतपंप बसवून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शाळेसमोर आणि आजूबाजूला केलेल्या बागेला आता बारमाही पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
शाळेच्या समोर केलेल्या लॉनमुळे शाळेच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
ज्या शाळेकडे बघून सरकारी शाळांची व्याख्याच बदलावी, अशी येथील मुलांची आणि मुलींची सुवर्णमहोत्सवी शाळा आहे. शैक्षणिक उठावांतर्गत शिक्षकांच्या समन्वयामुळे दोन लाख पन्नास हजार लोकवर्गणी जमा झाली होती. शाळेविषयी आस्था असणारे ग्रामस्थ सढळ हाताने आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करीत आहेत. शैक्षणिक उठावांतर्गत ग्रामस्थांनी केलेल्या आर्थिक मदतीतून शाळेची केलेली अंतर्गत रंगरंगोटी व बोलक्या भिंती लक्ष वेधून घेत आहेत.
ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे.
शाळेच्या निर्मितीला दीडशे वर्षे झाली आहेत. शाळेने अनेक आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. तालुक्यात सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा म्हणून शाळेचा लौकिक आहे.
शाळेच्या बोलक्या भिंतींवर आकाशगंगा, मूल्ये, शाळेची वैशिष्ट्ये सांगणारे फलक, विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक, पक्षी, प्राणी, अभयारण्ये, धरणे, महासागरांसह विविध प्रकारची माहिती विद्यार्थ्यांसह शाळेत येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडणारी आहे. दोन्ही शाळांत सध्या पाचशे विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.