इस्लामपूर येथे रमजान ईदच्या पूर्वसंध्येला अप्पर पोलीसप्रमुख मनीषा दुबुले यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृष्णात पिंगळे, नारायण देशमुख, आबीद मोमीन, पीरअली पुणेकर, हाफीज रियाज इबुशे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी रमजानच्या पवित्र महिन्यात जो संयम दाखविला, तो कौतुकास्पद आहे. शुक्रवारी साजरी होणाऱ्या रमजान ईदची नमाज सर्वांनी घरीच अदा करून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अप्पर पोलीसप्रमुख मनीषा दुबुले यांनी केले आहे. याचवेळी त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
येथील मोमीन मोहल्ला परिसरातील आझाद चौकामध्ये दुबुले यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या वर्षभरापासून कोणताही भेदभाव न ठेवता कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी सामूूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढील काळात लहान मुलांनाही या कोरोना संसर्गाचा फटका बसू शकतो. याची खबरदारी घेत मुस्लिम बांधवांनी गर्दी होणार नाही या दृष्टीने घरीच ईदची नमाज अदा करावी.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, गेल्या महिन्याभराच्या काळात मुस्लिम समाजाने अत्यंत संयमाने पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. उद्या साजरी होणाऱ्या रमजान ईदच्या निमित्तानेही असाच संयम दाखवत आपआपल्या घरी नमाज पठण करावे.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. आबीद मोमीन, हाफीज रियाज इबुशे, माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, शकील जमादार, रफीक किणीकर उपस्थित होते.