शीतल पाटील ।सांगली : महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली असली तरी, स्थायी समितीत मात्र बहुमताचा गुंता वाढला होता. पण अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांना भाजपच्या गोटात खेचून संख्याबळाचा तिढा सोडविण्यात भाजपला यश आले आहे. अन्यथा स्थायी समितीत भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे समान संख्याबळ झाले असते. प्रसंगी सभापती पदाचा निर्णय चिठ्ठीवर झाला असता. पण हा बाका प्रसंग टाळण्यात भाजपची नेतेमंडळी यशस्वी ठरली.
महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली असून त्यांचे ४१ नगरसेवक आहेत. विरोधी काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी केली होती. स्वाभिमानी आघाडीच्या चिन्हावर विजय घाडगे विजयी झाले, तर प्रभाग दोनमधून काँग्रेसचे बंडखोर गजानन मगदूम निवडून आले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपच्या पहिल्या महापौर व उपमहापौरांचीही निवड झाली. संख्याबळात भाजप वरचढ ठरले असले तरी, स्थायी समितीत बहुमताचा आकडा गाठण्याची कसरत भाजपला करावी लागणार होती.
स्थायी समितीची सदस्यसंख्या १६ इतकी आहे. भाजपकडे ४१ नगरसेवक असल्याने त्यांचे आठ सदस्य स्थायी समितीत जाणार आहेत, तर काँग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचे तीन सदस्य स्थायी समितीत असतील. एका सदस्यासाठी भाजप व दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच निर्माण झाली असती. पण भाजपने गजानन मगदूम यांना सहयोगी सदस्य केल्याने त्यांचे संख्याबळ ४२ वर पोहोचले.
परिणामी ही एक जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे आता भाजपचे ९ सदस्य स्थायी समितीत असतील, तर दोन्ही काँग्रेसचे मिळून ७ सदस्य असतील. मगदूम व विजय घाडगे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला असता, तर काँग्रेसची संख्या चारवरून पाचवर गेली असती. राष्ट्रवादीचे तीन सदस्य होते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे मिळून आठ सदस्य झाले असते. अशावेळी भाजप व दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संख्या सम-समान झाली असती. परिणामी स्थायी समिती सभापती निवडीत पुन्हा घोडेबाजार रंगला असता. पण हा तिढा सोडविण्यात भाजप यशस्वी ठरली. कोणताही गाजावाजा न करता ऐनवेळी मगदूम यांना भाजपच्या गोटात आणण्यात आले. त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनीही फिल्ंिडग लावली होती. पण त्यांना यश आले नाही.नेमके काय झाले...काँग्रेसकडे २० नगरसेवक आहेत. त्यांना विजय घाडगे व गजानन मगदूम या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला असता, तर त्यांचे संख्याबळ २२ वर गेले असते. परिणामी काँग्रेसचा कोटा ४.५१ इतका झाला असता. त्यामुळे काँग्रेसची एक जागा वाढून त्यांचे पाच सदस्य स्थायी समितीत आले असते. पण भाजपने वेळीच सावधगिरी बाळगत मगदूम यांना आपल्याकडे खेचल्याने काँग्रेसचे गणित बिघडले.संख्याबळ : कोणाचे, कसे...स्थायी समितीची सदस्यसंख्या १६ आहे. प्रत्येक पक्षाच्या संख्येनुसार सदस्यांचा कोटा निश्चित केला जातो. एका सदस्यासाठी ४.८७५ इतका मतांचा कोटा आहे. भाजपचे ४१ नगरसेवक आहेत. त्यानुसार भाजपच्या वाट्याला ८.४१ इतका कोटा येतो. म्हणजेच त्यांचे आठ नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य बनू शकतात. काँग्रेसकडे २० नगरसेवक आहेत. त्यांचा कोटा ४.१०, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक असून त्यांचा कोटा ३.०७ इतका होतो. म्हणजे काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक स्थायीचे सदस्य बनू शकतात. अशावेळी एका जागेचा प्रश्न कायम राहतो. अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ४२ वर पोहोचले. म्हणजे त्यांचा कोटा ८.६१ वर पोहोचला. त्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. परिणामी भाजपचे नऊ सदस्य स्थायी समितीत असतील.