सांगली : गेल्या आठवड्यापासून घटत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल केले. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांखाली आल्याने तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आले असून, सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले. जिल्ह्याच्या काही भागात निर्माण झालेली महापूरस्थितीवगळता इतर भागातील व्यापाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजारावर असल्याने पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर कायम होता. या आठवड्यात मात्र दिलासा मिळताना, रुग्णसंख्या आठशेवर आली आहे. यामुळे पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने तिसऱ्या स्तरात जिल्ह्याचा समावेश केला आहे. रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले.
प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार दुपारी चारपर्यंत आता सर्व व्यवसाय, सेवा सुरू राहणार आहेत.
नवीन आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहेत. त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ५० टक्के क्षमतेसह सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शहरासह जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांना पुराचा फटका बसल्याने त्याठिकाणी व्यवहार सुरू होण्यास अडचणी असल्या तरी तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू केल्याने जिल्ह्यातील इतर ठिकाणी मात्र, सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत. त्यामुळे महिनाभरापासून दुकाने उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चौकट
वीकेंड लॉकडाऊन असणार
प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असली तरी शनिवार व रविवारी दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस संपूर्ण जिल्हाभर ‘वीकेंड लॉकडाऊन’ असणार आहे.