इस्लामपूर : विचार, भावना आणि वर्तन यांच्या संतुलनातून प्रभावी व्यक्तिमत्व घडते. माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्तिमत्त्व सुधारू शकतो, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी (जळगाव) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित ‘मन के साथ, मन की बात’ विषयांतर्गत पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात प्रदीप जोशी बोलत होते. त्यांनी ‘चला डोकावूया मनाच्या गाभाऱ्यात’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. ते म्हणाले, मन ही एक संकल्पना आहे. माणसाची बुद्धी, भावना, वासना, स्मरणशक्ती, कल्पना, जाणीव या स्वरूपाच्या अनेक अभिव्यक्तींमधून व्यक्तीचे मन बनते. हे सर्व मेंदूत असते. मेंदूत एक हजार कोटींपेक्षा अधिक मज्जापेशी असतात. मेंदूची रचना व कार्यपद्धती कशी गुंतागुंतीची असते, हे त्यांनी अनेक स्लाईडच्या सादरीकरणातून सांगितले. मोठा मेंदू, लहान मेंदू व मस्तिष्क स्तंभ यांची स्थाने आणि त्यांची कार्येही त्यांनी सांगितली.
‘अंनिस’चे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद भारुळे (अहमदनगर) यांनी स्वागत केले. रवींद्र पाटील (नंदुरबार) यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सुशीलकुमार इंदवे (नाशिक) यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय बनसोडे, नंदकुमार तळाशीलकर, नितीनकुमार राऊत, विनायक सावळे, अवधूत कांबळे, अनिल करवीर, कीर्तीवर्धन तायडे यांनी केले.