अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूरनजीक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत पेठ-वाघवाडी-जांभुळवाडी गावातील कार्यक्षेत्रात औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकार आग्रही होते. त्यासाठी तीन टप्प्यात जमिनी आरक्षित केल्या होत्या. याला राष्ट्रवादीसह विरोधी नेत्यांनी विरोध केला होता. त्यानंतर युती शासनाने औद्योगिक वसाहत रद्द केली होती. आता महाआघाडीचे सरकार आले असून, जयंत पाटील पालकमंत्री बनले आहेत. त्यामुळे पुन्हा औद्योगिक वसाहतीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
इस्लामपूरलगत साखराळे हद्दीमध्ये आणि पेठनाक्यापासून १३ किलोमीटरवर शिराळा येथे औद्योगिक वसाहत आहे. या दोन्ही वसाहतीमध्ये नावाजलेले उद्योजक आले नाहीत. त्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी कागलप्रमाणे पेठ-वाघवाडी येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी देऊन जमिनी आरक्षित करण्यात आल्या. पहिले दोन टप्पे पूर्णत्वाला आले होते. पेठ-वाघवाडी-जांभुळवाडी येथील एक हजार एकर जमीन आरक्षित केली. यापैकी ९00 एकर जमीन पिकावू आहे. त्यामुळे भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी आंदोलन करून औद्योगिक वसाहत रद्द करण्याची मागणी केली. त्यावर युती शासनाने ती रद्द केली. सध्या मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. औद्योगिक वसाहतीतील बरेच परप्रांतीय कामगार निघून गेले आहेत. या भागातीलही कुशल-अकुशल कामगार गावी आले आहेत. भविष्यात त्यांना नोकऱ्या मिळतीलच याची निश्चिती नाही. त्यामुळे या रद्द झालेल्या वसाहतीची चर्चा सुरू झाली आहे.
पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी या परिसरातील जमिनींची माहिती महसूल विभागाने मागितली असल्याचे निवेदन माझ्याकडे आले आहे. येथील शेतीला वाकुर्डे योजनेचे पाणी मिळणार आहे. त्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे पिकावू जमिनी औद्योगिक वसाहतीला देण्यास विरोध आहे. यासाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करून विरोध करणार आहोत.- सम्राट महाडिक, भाजप, माजी जिल्हा परिषद सदस्य
पेठ-वाघवाडी-औद्योगिक वसाहतीबाबत शासनाकडून कोणतेही आदेश आले नाहीत. याबाबत परिसरातील राजकीय पदाधिकारी, शेतकरी विचारणा करत आहेत.- नागेश पाटील, प्रांताधिकारी, इस्लामपूर