इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी-पेठ दरम्यानच्या बॉम्बे रेयॉन कंपनीसमोर साताऱ्याकडे चाललेल्या मोटारीचा टायर फुटून ८० वर्षांची वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर तिघे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.
कलावती नारायण कणसे (वय ८०, रा. अंगापूरवंदन, जि. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे, तर नारायण कणसे (९९), शुभांगी कणसे (५७) आणि सोनाली कणसे (२७, सर्व रा. अंगापूरवंदन, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कणसे कुटुंबीय त्यांच्या चारचाकी मोटारीतून (क्र. एमएच १२ सीवाय २७१९) जोतिबा आणि कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून साताऱ्याकडे परत जात असताना, तेवाघवाडीच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या मोटारीच्या डाव्या बाजूचा पुढील टायर फुटल्याने मोटार उलटली. या मोटारीत डाव्या बाजूस बसलेल्या कलावती कणसे यांच्या डोक्याला मार लागून त्या जागीच ठार झाल्या. विनायक कणसे यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.