सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपचे अर्ज मागविले नाहीत. त्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, अशी टीका करीत, याबाबत रिपब्लिकन स्टुडंट युनियनने मुख्यमंत्री व राज्यपालांकडे तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या केंद्राची स्थापना ही १९७८ मध्ये करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यासंबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच या समाजातील संशोधकांना वाव देण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. परंतु ‘बार्टी’ने जाणीवपूर्वक फेलोशिपकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची आहे, २०२० पासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे, असा प्रश्न पडलेला आहे. राज्य सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे तत्काळ फेलोशिपचे फॉर्म भरून सर्वच पीएच.डी., एम.फिल्. विद्यार्थ्यांना तत्काळ फेलोशिप देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.