दिलीप मोहिते विटा (सांगली) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी विटा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज, बुधवारी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसेच मराठा समाजाबद्दल बैताल वक्तव्य करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम, सदाभाऊ खोत, छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चप्पलने झोडून काढले. त्यानंतर या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून चौकातच त्याचे आंदोलकांनी दहन केले.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी मराठा कृती समितीचे प्रमुख शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून विटा येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.संतप्त आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते, मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, महायुतीचे मंत्री छगन भुजबळ, रयत क्रांतीचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रामदास कदम यांचा आंदोलकांनी रावण रूपी प्रतिकात्मक पुतळा तयार केला होता. या पुतळ्याची आंदोलकांनी अंत्यरात्रा काढली. त्यानंतर चौकात या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने मारहाण करीत पुतळ्याचे दहन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी सदावर्ते यांचा उल्लेख गाढव, नारायण राणेंचा उल्लेख कोंबडी चोर बेवडा आणि सदाभाऊ खोत यांचा उल्लेख कडकनाथ कोंबडी चोर असा केला.यावेळी आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनासाठी भाळवणी, ढवळेश्वर, पंचलिंगनगर येथील मराठा आंदोलक पायी चालत विट्यात दाखल झाले होते. मराठा कृती समितीचे शंकर मोहिते व विकास जाधव यांनी मराठा समाजाबद्दल बोलताना संयमाने बोलावे, अन्यथा मराठा काय आहे, हे दाखवून देऊ, यापुढील आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी दहावीर शितोळे, विकास पवार, अजय पाटील, जगन्नाथ पाटील, दिशांत धनवडे, राजू जाधव, विनोद पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह मराठा समाजातील तरूण उपस्थित होते.
सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:44 PM