सांगली : हॉटेलमध्ये जाऊन सहपरिवार, मित्रांसह स्वादिष्ट चमचमीत भोजनाचा आस्वाद घेण्याच्या खाद्यपरंपरेचे स्वरुप कोरोनाने बदलले. कुरिअरसारखी खाद्य पार्सल सेवा उदयास येताना घरोघरी पाककलेत निपुणता येऊन सुग्रणींनी घरच्या पदार्थांना हॉटेलचा स्वाद मिळवून दिला.
जिल्ह्यातील खाद्य व्यवसायातील महिन्याची उलाढाल १५० कोटीच्या घरात आहे. कोरोना काळात आठ महिने हॉटेल व्यवसाय बंद राहिला. या काळात केवळ पार्सल सेवा सुरू होती. पार्सल सेवेवर भर देत हॉटेल व्यावसायिकांनी ऑनलाईन मार्केटिंग सुरू केले. खाद्य पार्सल पुरविणाऱ्या व्यावसायिक संस्थांशी येथील हॉटेल्स जोडली गेली. नाष्टा, जेवणासह विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्याची सवय लागलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी घरांमध्ये हाॅटेलिंगचा आनंद घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या मालाची विक्री या काळात दुप्पट, तिप्पट झाली. मोजक्याच पदार्थांमध्ये निपुण असलेल्या गृहिणींनी लॉकडाऊन काळात अनेक पाककला अवगत केल्या.
एरवी बेकरीतूनच आणला जाणारा केक घरोघरी बनविला जाऊ लागला. बेकरी पदार्थांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनपूर्वी असणारा कच्च्या मालाचा खप लॉकडाऊनमध्ये चौपट वाढला. केकसह, इडली, डोसा, आप्पे, पिझ्झा, पाणीपुरी, भेळ, भडंग, पॅटिस, पावभाजी अशा अनेक पाककलांमध्ये गृहिणी पारंगत झाल्या. एकूणच हॉटेल आणि घरगुती खाद्यसंस्कृतीचे चित्र पूर्णपणे बदलून गेले.
साधनांचा वापर वाढला
कुकर, मिक्सर, इडली, डोशाची भांडी इतकीच साधने वापरणाऱ्या महिलांनी टोस्टर, ओव्हन, आईस्क्रिम मेकर मशीन, इलेक्ट्रिक बिटर, हॅण्ड मिक्सर यांचाही वापर सुरू केला.