सांगली: विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आलेल्या दिवाळीत सांगलीकर नागरिकांचे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हाल होत आहेत. सांगलीसह परिसरातील महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा यंत्रणांच्या कारभारावर तसेच येथील लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करताना विडंबनात्मक संदेश सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. भाऊबीजेच्या सणाचा मुहूर्त साधत त्यांनी सांगलीच्या महिला आपल्या भावांच्या सुरक्षिततेची ओवाळणी खड्ड्यांकडून मागताना दर्शविण्यात आले आहे.
नागरिक जागरुती मंचतर्फे हे पोस्टर सोशल मिडियावर टाकण्यात आल्यानंतर दिवसभर याची चर्चा सुरू होती. या विडंबनात्मक फलकावर नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात आहे. त्यात साखळकर यांनी म्हटले आहे की, आज भाऊबीज आहे प्रत्येक बहिणीचे भाऊ आपल्या बहिणीकडे भाऊबीजसाठी जात येत (प्रवास करत )असतात त्या समस्त भावासाठी सांगलीतील लाडक्या बहिणीची खड्ड्यांकडे आर्त विनवणी सुरू आहे.
माझ्या भावाला सुरक्षित ठेव, त्याचा प्रवास सुखाचा होऊंदे म्हणून खड्डे रुपी भावाला प्रार्थना करत आहेत. कारण सगळ्या जबाबदार व्यवस्थेला, लोकप्रतिनिधी त्यांना सांगून काहीही फरक पडला नाही म्हणूनच त्या खड्यालाच सांगलीतील बहिणी भाऊबीज मागत आहेत. या अनोख्या पोस्टर आंदोलनाने आता राजकीय मंडळींची व यंत्रणांची ऐन दिवाळीत गोची झाली आहे.