अविनाश कोळी । सांगली : रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी नुकसानीचे घाव सोसूनही कलेतून मिळणाऱ्या आनंदाला कवेत घेतले आहे. आता कोरोना काळात मुख्यमंत्रीनिधीला मदत करण्यासाठी त्यांनी चित्रे विक्रीस काढली आहेत.
वीसवेळा जागतिक विक्रमांची नोंद करणा-या या रंगावलीकाराने कर्जबाजारीपणा सोसून कलेला जिवंत ठेवले. कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयात ते शिक्षक आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने त्यांना घरी बसून समाजासाठी काहीतरी करावेसे वाटत होते. परिस्थिती बेताचीच असल्याने मुख्यमंत्रीनिधीस फारशी मदत देता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून निधी संकलनाचा निर्णय घेतला. अडीच महिन्यात त्यांनी अनेक महामानवांची चित्रे रेखाटली.
विश्वविक्रमी रांगोळीतून साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळाही त्यांनी कॅनव्हासवर उतरविला. १४ चित्रांनंतर आणखी चित्रांचे साकारणे सुरूच आहे. छत्रपती शिवरायांची चार व्यक्तिचित्रे, शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाची तीन यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजीराजे यांच्या चित्रांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात कलाप्रेमींनाही आर्थिक त्रास होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली. ती कमी किमतीत विक्रीसाठी ठेवली आहेत. कलाप्रेमींना शासनाला मदत करतानाच कलेचा आनंदही मिळणार आहे. जमलेल्या रकमेतून खर्चाची म्हणजे ५० टक्के रक्कम ठेवून उर्वरित रक्कम निधीसाठी दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कणखरपणे राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळल्याने देशभर त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्टÑाचा नागरिक म्हणून मलाही त्याचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे एक चित्र त्यांना भेट देणार आहे. कोरोना काळातील मदत केवळ फुलाची पाकळी असेल, पण त्याचा सुगंध प्रामाणिक आहे. - आदमअली मुजावर, रंगावलीकार
विदेशी महागड्या आॅईल कलरचा तसेच उच्च दर्जाच्या कॅनव्हासचा वापर यासाठी केला गेला आहे. त्यामुळे ही चित्रे शंभर वर्षे टिकतील, असा दावा आदमअली मुजावर यांनी केला आहे.