सांगली - पाचशे रुपयांच्या नोटांना घड्या घातल्यानंतर नोटांचे तुकडे पडत असल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील विटा येथे घडली आहे. विटा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी ही बाब स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकास निदर्शनास आणली. शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांच्यासमोर राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांबाबत हा प्रकार घडल्याने या नोटा बदलून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अनिल राठोड यांच्या माहितीनुसार या नोटा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या आहेत. ही महिला रोजंदारीवर कामाला जाते. काही दिवसांपूर्वी या महिलेला कामाचे पैसै मिळाले होते. हे पैसे तिने पाकिटात ठेवले होते. दरम्यान, या महिलेने 15 मे रोजी पाकिटातील पाचशे रुपयांच्या सात नोटा बाहेर काढल्या आणि घडी करुन रुमालात बांधल्या. त्यानंतर ही महिला मिरच्या खरेदी करण्यासाठी बाजारात गेली. त्यानंतर तिने रुमाल उघडून दुकानदाराला पैसे द्यायला लागली तेव्हा नोटांचा तुकडे झाल्याचं पाहून तिला धक्का बसला. घाबरलेल्या या महिलेने अनिल राठोड यांना जाऊन हा प्रकार सांगितला. त्यांनीही नोटांच्या घड्या घालताच असा प्रकार झाल्याचं त्यांनाही आढळून आले.
अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकास हा प्रकार सांगितल्यानंतर एक नोट बँकेकडून बदलण्यात आली मात्र इतर नोटा बदलण्यास बँकेने नकार दिला आहे. त्यामुळे उर्वरित तुटलेल्या नोटांचे करायचे काय असा प्रश्न त्या वृद्ध महिलेसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान अनिल राठोड यांनी बँक व्यवस्थापक यांना घडलेला प्रकार आरबीआयच्या निदर्शनास आणून द्यावा अशी मागणी केली आहे.