प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेचे पाणी आता बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. ही योजना सौरऊर्जाचलित सिंचन योजना होणार आहे. याशिवाय योजनेच्या लाभक्षेत्रात ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर अनिवार्य होणार आहे. लाभक्षेत्रात वितरिकानिहाय पाणी वापर संस्था निर्माण करून या संस्थांच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटप धोरण राबविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने टेंभू योजना राज्यात पथदर्शी योजना होणार आहे. मात्र त्यासाठी भरीव निधीची गरज आहे. पाणी जपून वापरा, हा विचार पुढे धावतो आणि आचार मात्र मागे रेंगाळतो. त्यामुळेच टेंभू योजनेच्या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. सिंचन व्यवस्थापन विभागाकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणी वितरण व पाणीपट्टी वसुली ही कामे सक्षमपणे होत नाहीत. वीज बिल थकबाकीचे संकट सदैव योजनेसमोर असतेच. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या १६५ मेगावॅट वीज लागते. या पार्श्वभूमीवर टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात सांगली येथे केली आहे.या जलसाठ्यात पाणी भरण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा उपयोग पोहोच कालवे (फिडर कॅनॉल) म्हणून होणार आहे. गरज पडल्यास हे जलसाठे भरून देण्यासाठी बंद जलवाहिन्यांचा उपयोग केला जाणार आहे. या जलसाठ्यात घनमापन पद्धतीने पाणी मोजून दिले जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणीसाठा शेतकऱ्यांनी वापरला तरी, त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार नाही. लाभक्षेत्रात संपूर्ण ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर अनिवार्य होणार आहे.1 टेंभू योजनेचे पाणी आता पोटकालव्याऐवजी बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. योजनेच्या मुख्य कालव्यामध्ये अस्तरीकरण होणार आहे आणि फक्त पोटकालव्याऐवजी जलवाहिनीमधून पाणी देण्याची व्यवस्था होणार आहे.2 टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचन पध्दत राबविण्यात येणार आहे. जागोजागी १०० हेक्टर लाभक्षेत्रासाठी चक (ब्लॉक) करून १५ दिवस पुरेल इतक्या क्षमतेचे विकेंद्रित जलसाठे निर्माण केले जाणार आहेत.3 लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचा उपयोग जलसाठे म्हणून प्राधान्याने होणार आहे.पाणी वापर संस्थेला घनमापन पध्दतीने पाणी मोजून दिले जाणार आहे आणि पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणी वापर संस्थेवर राहणार आहे. त्यामुळे टेंभू योजना पाणीपट्टी वसुलीच्या अडचणीतून मुक्त होणार आहे. अशा पध्दतीने टेंभू योजना समन्यायी पाणी वाटप धोरण राबवून नवा आदर्श निर्माण करणार आहे.
टेंभू साकारणार राज्यातील पथदर्शी सिंचन प्रकल्प
By admin | Published: June 10, 2017 12:30 AM