घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : मिरजेतील जनावरांच्या बाजाराजवळ पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या जावेद जाकीर शेख (वय ३०, रा. ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे ५० हजाराचे पिस्तुल व दोन जीवंत काडतुसे जप्त केली.
अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी अभिजीत ठाणेकर आणि रोहन घस्ते यांना मिरजेतील जनावर बाजार परिसरात एकजण पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक परिसरात टेहेळणी करत असताना काही वेळाने टी शर्ट आणि जिन्सची पॅन्ट घातलेला एक तरूण जनावरांच्या बाजाराच्या प्रवेशव्दाराजवळ येवून थांबला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जावेद शेख असे नाव सांगितले. त्याची झडती घेतली असता कमरेस अडकवलेले ५० हजार रुपये किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तुल मॅग्झीनसह आढळले. तसेच २ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे त्यास पोलिसांनी अटक केली. पोलिस कर्मचारी अभिजीत ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख याला गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सहायक फौजदार अनिल ऐनापुरे तसेच अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, अनंत कुडाळकर, इम्रान मुल्ला, संकेत मगदुम, विनायक सुतार, सुनिल जाधव, सूरज थोरात, श्रीधर बागडी, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.