लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा व शाहुवाडी तालुक्यात सध्या गुऱ्हाळ हंगाम सुरू असून, अनेक गूळ उत्पादक थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून गुळाची विक्री करत आहेत. अनेक ठिकाणी रसायनयुक्त गूळ सेंद्रिय म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. गुळाची माहिती नसलेल्या ग्राहकांची या प्रकाराने फसगत होत आहे.
शिराळा तालुक्यात सध्या नवा गूळ बाजारात आला आहे. अनेकांनी बाजारपेठेत, रस्त्याकडेला स्टॉल उभारून विक्रीचा हंगामी व्यवसाय सुरू केला आहे. अनेक दुकानांमध्येही बाहेरून आयात केलेला गूळ विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यामध्ये रंगाने काळपट असलेला रसायनयुक्त गूळ सेंद्रिय असल्याचे सांगून वाढीव दराने विकला जात आहे.
वास्तविक सेंद्रिय गूळ सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या उसापासून बनवला जातो. हा ऊस तोडून गुऱ्हाळघरात आणल्यानंतर कोणतेही रसायन न वापरता केवळ चुना, शेंगतेल व नैसर्गिक भेंडी वापरून तयार केला जातो. या प्रकारात गुळाचा रंग तांबूस, काळपट असा असतो. या गुळाचा दर सामान्य गुळापेक्षा जास्त असतो. आरोग्यासाठी लाभकारक असल्याने तो खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल आहे.
चाैकट
काकवीच्या विक्रीतही फसवणूक
सध्या अनेक ठिकाणी काळपट रंगाचा सामान्य गूळ सेंद्रिय म्हणून वाढीव दराने ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. काकवीच्या विक्रीतही फसवणूक केली जात आहे.