सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात योग्य त्या सुविधा देण्यात येत आहेत. तरीही अजूनही याठिकाणी सुधारणा आवश्यक असून त्यासाठी प्रशासनाने रूग्णालयाच्या आधूनिकीकरणाचा आराखडा तयार करून शासनाला सादर करावा, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिले.
प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनातर्फे चांगली खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोवीड रूग्णालयात आयसोलेशन कक्षात काम करणार्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना सोयीसुविधांकडेही लक्ष द्यावे. सुरक्षा साधनांसह इतर सुविधा त्यांना देऊन सहकार्य करावे. मिरज शासकीय रूग्णालयाच्या आधूनिकीकरणाचा आराखडा प्रशासनाने तयार करावा व शासनास सादर करावा. त्यासाठी लागणारा निधीची पूर्तता करण्यास प्राधान्य देणार आहे. इस्लामपूर ग्रामीण रूग्णालयात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आयसीयू युनिट सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडे ट्रस्टकडे पाठपुरावा करून काम सुरू करावे.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळूंखे यांनी सांगितले की, कोरोना रूग्णवाढीची शक्यता गृहीत धरून त्रिस्तरीय उपचार पध्दती कार्यन्वित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार ३८ ठिकाणी कोवीड केअर सेंटर, ४९ ठिकाणी डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व ४ जिल्हास्तरीय कोवीड हॉस्पीटलचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, आयुक्त नितीन कापडनीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
चौकट
बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडलेले गलाई बांधवांनी तेथील प्रशासनाशी संपर्क साधून जिल्ह्यात येण्याची प्रक्रीया पूर्ण करावी. त्या राज्याने परवानगी दिलीतर त्यांना येता येणार आहे. शिवाय इथे आल्यानंतरही त्यांना १४ दिवस क्वारंटाईन होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.