इस्लामपूर : वाळवा तालुक्यात १ ते १५ मेपर्यंत शासनाच्या सर्व योजना घरा-घरापर्यंत पोहोचवणारा शासकीय पंधरवडा अभियानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोतिबिंदूमुक्त वाळवा तालुका करण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गावपातळीवर मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या सर्व यंत्रणांनी या काळामध्ये सामुदायिकपणे काम करुन तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले—पाटील, विक्रम पाटील, दि. बा. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, भास्कर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री खोत म्हणाले, ग्रामसभेतून मिळालेल्या अहवालाच्या आधारे तालुक्याच्या विकास कामांची दिशा निश्चित केली जाणार आहे. हा अहवाल हातात घेऊन संपूर्ण तालुक्यात गावदौरे करणार आहोत. शासकीय पंधरवडा अभियानातून बांधकाम कामगार योजना, शिधापत्रिका, संजय गांधी योजना, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, वारस दाखले जाग्यावर देण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य कार्ड वाटपही होईल. तालुक्यात गाई, म्हैशींचे गोठे वाढवले जातील. रमाबाई घरकुल योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.यावेळी प्रांताधिकारी जाधव यांनी गावनिहाय आढावा घेताना, सरकारी कामाच्या एक पाऊल पुढे जाऊन मदत करा, असे आवाहन केले. वीज वितरणबाबत आलेल्या सूचना व तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे. वारसा नोंदी प्रलंबित ठेवू नका. पाणंद रस्ते आणि वीज तारांच्या समस्या शोधून काढा. शासन आपल्या दारी अभियानातून नागरिकांची कामे थेट जागेवरच निर्गत करण्याचा प्रयत्न करा, असे स्पष्ट केले.या बैठकीस तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, वीज वितरण व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.गय करणार नाही : प्रांताधिकारी जाधवयेलूरमध्ये तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन तिघांचा बळी गेल्याच्या घटनेचे पडसाद बैठकीत उमटले. प्रत्येक गावातील विजेच्या तारा, खांब, फ्यूज पेट्या, जन्नित्र यांची गांभीर्याने विचारणा केली जात होती. प्रांताधिकारी जाधव यांनी, येलूर प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई झाल्याचे सांगत, यापुढे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला.इस्लामपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागेश पाटील, राजेंद्र जाधव, निशिकांत भोसले—पाटील, दि. बा. पाटील आदी उपस्थित होते.
योजना अभियान राबविणार : सदाभाऊ खोत -वाळवा तालुक्यामध्ये १ मेपासून पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:43 PM