इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ‘टार्गेट’ करून शहराचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील अन्यायी आरक्षणे रद्द करून नागरिकांच्या सुविधांसाठी परिपूर्ण विकास आराखडा मंजूर करावा, या मागणीसाठी सर्व घटकांना बरोबर घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.येथील शासकीय विश्रामगृहात खा. शेट्टी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी वगळता इतर घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, बाबा सूर्यवंशी, कपिल ओसवाल, एल. एन. शहा, विजय कुंभार, वैभव पवार, शकील सय्यद, अरुण कांबळे, सतीश महाडिक, जगन्नाथ चिप्रीकर, सनी खराडे, जयकर पाटील, भागवत जाधव उपस्थित होते. बैठकीत इस्लामपूरच्या नियोजित विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. शेट्टी यांनी उपस्थित प्रतिनिधींचे मत आणि तक्रारी ऐकून घेतल्या. खा. शेट्टी म्हणाले, शहराची २०३० पर्यंतची वाढ गृहीत धरून सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा परिपूर्ण आराखडा असावा, अशी आमची भूमिका आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मनमानीपणे हा आराखडा तयार केला आहे. विरोधकांचा काटा काढायचा आणि आपल्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. पूर्वीच्या कॉँग्रेस आघाडी सरकारने या विकास आराखड्याबाबत निर्णय घेतला नाही. ते म्हणाले, राज्यात महायुती झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी इस्लामपूरचा विकास आराखडा रद्द करण्याबाबत आश्वासन दिले होते. याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे आराखडा अंतिम व्हायच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटून अन्यायी आरक्षणे रद्द करण्यासह आरखड्यासाठी सुधारणाही सूचवणार आहोत.विक्रमभाऊ पाटील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आराखडा रद्द करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध चौका-चौकात जाहीर सभा घेतल्यावर २३०० नागरिकांनी आराखड्याविरोधात हरकती दाखल केल्या. नागरिकांचा हा रोष पाहून मग आ. जयंत पाटील यांनी अन्यायी आरक्षणे रद्द करू, असे आश्वासन दिले. तेथेच आम्ही यशस्वी झालो. राज्यात आता सत्तांतर झाले आहे, त्यामुळे हा अन्यायी आराखडा एक तर रद्द करणे किंवा चुकीची आरक्षणे वगळून शहरातील नागरिकांना दिलासा देण्याची जबाबदारी आमचीही आहे. ते म्हणाले, यापूर्वीच आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून आराखड्यात अन्याय झालेल्यांची यादी, मोठे रस्ते लहान केल्याची यादी, मोठे रस्ते रद्द केल्याची यादी दिली आहे. इतर अन्यायकारक बाबीही त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारींची दखल घेतली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. भाजपच्या सर्व वरिष्ठ मंत्र्यांच्या सहकार्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. (वार्ताहर)आठवलेंचा दौरा : रान तापविण्याचा प्रयत्नखा. राजू शेट्टी यांनी या बैठकीत येत्या १३ एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टीचे खासदार रामदास आठवले हे इस्लामपूर दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचा मोठा कार्यक्रम घेणार आहेत. शहरातील पालिकेमार्फत रखडलेल्या आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाच्या विषयावरून सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान तापावण्याचीच तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
इस्लामपूरचा आराखडा परिपूर्ण हवा
By admin | Published: March 25, 2016 11:07 PM