पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. पी. एम. चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सागाव, कणदूर, पुनवत, चिखली, नाटोली या पाच केंद्रांवर कोविडचे नियोजनबद्ध लसीकरण सुरू आहे. सर्व गावांतील नागरिकांना लसीकरणाचा लाभ देण्याची दक्षता घेतली जात आहे.
सागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह पाच लसीकरण केंद्रांवर गेल्या अडीच महिन्यांपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. पी. एम. चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी लसीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.
आतापर्यंत सागाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांमध्ये ४५ वर्षांवरील ६३०८ लाभार्थ्यांपैकी आजअखेर ६१५६ लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. याकामी सागाव ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळत आहे.
चौकट
डॉ. निर्मळेंचा कर्तव्यदक्षपणा
वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे कोरोना काळापासून धोकादायक परिस्थितीतही कर्तव्यदक्षपणे रुग्णसेवा बजावत आहेत .नियोजनबद्ध सेवा असल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांचेही मोठे सहकार्य मिळत आहे.