विटा : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून भारतीय जवानांसाठी ‘जयहिंद रक्तदान यात्रा’ सुरू असून, एक लाख बाटल्या रक्त संकलित करण्यात येणार आहे. या उपक्रमात दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात दि. २३ नोव्हेंबरला हजार युवक रक्तदान करणार होते. परंतु, दिल्लीतील खराब हवामानामुळे हा उपक्रम पुढे ढकलण्याची विनंती आर्मी रुग्णालयाने चंद्रहार यांना केली. त्यामुळे आर्मी रक्तदाता एक्स्प्रेसचे नियोजन लांबले आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने जयहिंद रक्तदान यात्रेनिमित्त दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करण्याचे नियोजन होते. त्यासाठी सांगलीहून आर्मी रक्तदाता एक्स्प्रेस ही संपूर्ण विशेष रेल्वे सुटणार होती. परंतु, दिल्लीत प्रदूषण वाढल्यामुळे तेथील शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आर्मी रुग्णालयातील रक्तदान उपक्रम काही दिवसांसाठी स्थगित करून पुढे ढकलण्याची विनंती चंद्रहार यांच्याकडे केली होती.
या परिस्थितीच्या अनुषंगाने दिल्लीच्या बाहेरून रक्तदाते येऊन गंभीर प्रदूषण आणि थंडीमध्ये रक्तदान करणे हे रक्तदात्यांच्या आरोग्यास धोक्याचे ठरू शकते, असे आर्मी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आर्मी रक्तदाता एक्स्प्रेस उपक्रम पुढील सूचनेपर्यंत लांबविण्यात येत असल्याचे चंद्रहार यांनी सांगितले.