सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या प्रलंबित प्रश्नासाठी रविवार दि. १७ रोजी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. शहरात विविध बैठकांसह आता गावामध्येही कार्यकर्ते एकत्र येत मोर्चात सहभागी होण्यासाठीचे नियोजन करत आहेत. २०१६ मध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चा इतकाच भव्य दिव्य आणि संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल असा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनस्तरावरून उदासीनता दिसून येत असल्याने समाजात असंतोष वाढत आहे. अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर या आंदोलनाला आता धार आली आहे. गुरूवार दि. ७ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आल्यानंतर लगेचच मोर्चाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आता मोर्चाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दररोज विविध गावात बैठक आणि मोर्चा दिवसाचे नियोजनाचा आराखडा संपर्क कार्यालयात केले जात आहे. सायंकाळी संपूर्ण दिवसभरात केलेले कामकाज आणि दुसऱ्या दिवशी करावयाच्या कामाबाबत ही चर्चा होत आहेत.
महिलांचा सक्रिय सहभागमराठा क्रांती मोर्चामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असणार आहे. त्यासाठी मोर्चाची आघाडी सांभाळण्याचे काम त्या करत आहेत. बंद वेळीही निघालेल्या लक्षवेधी रॅलीचे नेतृत्व महिलांनी केले होते. आताही मोर्चाच्या नियोजनात केवळ पुरूषांचा सहभाग नाहीतर महिलाही त्यात सहभागी होत असून, उपनगरात त्यांनी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर वाढती चर्चाजिल्हा बंद यशस्वी झाल्यापासून मोर्चाची तयारी करण्यात येत आहे. त्यात सोशल मीडियावरही आता मराठा आरक्षणासाठी लढाईसाठी प्रत्येकाने मोर्चात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून विविध संघटना आणि तरूणांकडून पाठिंबा ही वाढत आहे.
राज्यासाठी आदर्शवत मोर्चासांगलीत यापूर्वी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा हा आदर्श मोर्चा ठरला होता. लाखो समाजबांधवांचा सहभाग असूनही शांतता, प्रशासनाला सहकार्याच्या भूमिकेमुळे कोठेही ताणतणाव निर्माण झाला नव्हता. अगदी तसाच यावेळीही संपूर्ण राज्यात आदर्शवत मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागणीसाठी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने आता पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शहरात विविध भागात बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातही बैठक होत आहेत. - डॉ. संजय पाटील, समन्वयक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आंदोलन करण्यात आले होते. आता सांगलीत निघणाऱ्या मोर्चात ही सर्वांचा सक्रिय सहभाग असणार आहे. समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे आता सरकारने दुर्लक्ष करू नये. - प्रणिता पवार, जिजाऊ ब्रिगेड