सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. महिलांच्या पर्समधील दागिने, राेख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा संशय असल्याने आता चोऱ्या रोखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी गस्तीपथकांची संख्या वाढवून ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकात चोरीचे प्रकार वाढले आहेत. मिळेल त्या वस्तूवर चोरटे डल्ला मारत आहेत. चार दिवसांपूर्वी इचलकरंजीहून तासगावला जाण्यासाठी सांगली बसस्थानकात आलेल्या महिलेच्या तब्बल साडेसहा लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात मारला होता. बसमध्ये चढताना होत असलेली गर्दीचा फायदा घेत या चोऱ्या हाेत आहेत. त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर बसस्थानकावरील चोऱ्या राेखण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
चौकट
चोरीचे प्रकार रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र प्रवाशांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादा किमतीच्या व मौल्यवान वस्तू सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाऊ नयेत. जरी त्या सोबत बाळगल्या तरी त्याकडे लक्ष द्यावे. चोरीची घटना घडल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. तक्रार देण्यास टाळाटाळ होत असल्यात थेट संपर्क साधावा, असेही अधीक्षक गेडाम म्हणाले.