कऱ्हाड : ‘पालिकेतील जलशुद्धीकरण केंद्रात २३ वर्षांपासून काम करत असलेल्या ४६ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याने पालिकेतील या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सेवेत घेतले जात नाही. तोपर्यत उपोषण सोडणार नाही. तसेच प्रसंगी आंदोलन तीव्र करू,’ असा इशारा सह्याद्री श्रमिक महासंघाचे अध्यक्ष एकनाथ बागडी यांनी दिला. पालिकेतील जलशुद्धीकरण केंद्रातील ४६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी येथील पालिकेसमोर सह्याद्री श्रमिक महासंघाच्या वतीने गुरुवारपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बागडी यांनी इशारा दिला. उपोषणास अध्यक्ष बागडी यांच्यासोबत मोहन बेंद्रे, सचिन कदम, लक्ष्मण खांडे, ज्ञानेश्वर शिंदे, सत्याप्पा गोरड यांनी सुरुवात केली.तेवीस वर्षे काम करून जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आल्याने त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सह्याद्री श्रमिक महासंघाने कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी सह्याद्री श्रमिक महासंघासह ४६ कर्मचाऱ्यांनी सकाळी येथील दत्तचौकातून पंचायत समिती मार्गे, चावडी चौक, कन्याशाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पालिकेवर भव्य निषेध मोर्चा काढला. पालिकेसमोर गेल्यावर सह्याद्री श्रमिक महासंंघ व कर्मचारी उपोषणास बसले.यावेळी सह्याद्री महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २३ वर्षांपासून ४६ कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्रात पंपचालक, गाळणीचालक, व्हायमन, पाणी तपासणी, लेवलमन या पदावर विनाखंडित २३ वर्षे सेवा करत असताना त्यांनी सेवेत कायम करून घ्यावे म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे पालिका प्रशासन कामगारांना कामावर येऊ नका असे तोंडी सांगत आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे प्रयत्न मुख्याधिकारी यांनी सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा उलटून गेल्याने इतर कोणत्याही ठिकाणी ते काम करू शकत नाहीत. तरी त्यांना तत्काळ कामावर रूजू करून घ्यावे, अन्यथा उपोषण अधिक तीव्र केले जाईल. (प्रतिनिधी)पालिकेचे जलशुद्धीकरण स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या भरवशावरकऱ्हाड पालिका मुख्याधिकारी यांनी जलशुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जागेवर दोन महिन्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ड्रेनेज विभागात बिगारी म्हणून काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आता जलशुद्धीकरण केंद्राचे काम चालविले जात आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याचा पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहे.
कऱ्हाड पालिकेसमोर पन्नास कर्मचाऱ्यांचा ठिय्या
By admin | Published: June 30, 2016 11:04 PM